Tuesday, December 2, 2008

गीतरामायणाचे रामायण!

गीतरामायणाचे रामायण!

गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला.1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण 1953 साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी 28000 श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण 56 गीतांत शब्दबध्द केली आहे.
माडगूळकरांनी श्रीराम कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केला आहे,या कथाभागात एकूण 27 व्यक्ती येतात.सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडी आहेत,त्या खालोखाल सीतेची आठ,कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन,दशरथ,विश्वामित्र,लक्ष्मण,सुमंत,भरत,शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक,यज्ञपुरुष,अयोध्येतील स्त्रिया ,आश्रमीय,अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे.
संपूर्ण 56 गीतांसाठी सुधीर फडके यांनी 36 रागांचा वापर केला आहे.यात मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, भैरवी चार, भीमपलास, मिश्र मोड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन,अशा या 26 रचना सोडल्या तर उर्वरित 30 स्वररचना या 26 रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत.26 रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुध्द सारंग, ब्रिंदावनी सारंग, मुलतानी ,तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुध्द कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे.
आकाशवाणीने प्रसारित केलेल्या गीतरामायणाचे निवेदन पुरुषोत्तम जोशी यांनी केले आहे.
गायक व गायिका :सुधीर फडके,माणिक वर्मा,राम फाटक,वसंतराव देशपांडे,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,गजानन वाटवे,ललिता फडके,मालती पांडे,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर ,लता मंगेशकर,सुमन माटे,जानकी अय्यर,सौ.जोग.
वादक : प्रभाकर जोग,अप्पा इनामदार,अण्णा जोशी,सुरेश हळदणकर,केशवराव बडगे.

1) कुश लव रामायण गाती : सुधीर फडके
2) सरयू तीरावरी : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
3) उगा का काळिज माझे उले : ललिता फडके
4) उदास कां तूं ? : बबनराव नावडीकर
5) दशरथा,घे हे पायसदान : सुधीर फडके
6) राम जन्मला ग सखी : समूह गान
7) सांवळा ग रामचंद्र : ललिता फडके
8) ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा : राम फाटक
9) मार ही ताटिका रामचंद्रा : राम फाटक
10) चला राघवा चला : चंद्रकांत गोखले
11) आज मी शापमुक्त जाहले : मालती पांडे
12) स्वयंवर झाले सीतेचे : सुधीर फडके
13) व्हायचे राम अयोध्यापति : समूह गान
14) मोडुं नका वचनास : कुमुदिनी पेडणेकर
15) नको रे जाउ रामराया : ललिता फडके
16) रामाविण राज्यपदी कोण बैसतो ? : सुरेश हळदणकर
17) जेथे राघव तेथे सीता : माणिक वर्मा
18) थांब सुमंता,थांबवि रे रथ : समूह गान
19) जय गंगे,जय भागिरथी : समूह गान
20) या इथे लक्ष्मणा,बांध कुटी : सुधीर फडके
21) बोलले इतुके मज श्रीराम : गजानन वाटवे
22) दाटला चोहिकडे अंधार : सुधीर फडके
23) मात न तूं वैरिणी : वसंतराव देशपांडे
24) चापबाण घ्या करीं : सुरेश हळदणकर
25) दैवजात दु:खे भरता : सुधीर फडके
26) तात गेले ,माय गेली,भरत आता पोरका : वसंतराव देशपांडे
27) कोण तू कुठला राजकुमार ? : मालती पांडे
28) सूड घे त्याचा लंकापति : योगिनी जोगळेकर
29) मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा : माणिक वर्मा
30) याचका,थांबु नको दारांत : माणिक वर्मा
31) कोठे सीता जनकनंदिनी ? :सुधीर फडके
32) ही तिच्या वेणिंतिल फुले : सुधीर फडके
33) पळविली रावणें सीता : राम फाटक
34 ) धन्य मी शबरी श्रीरामा! : मालती पांडे
35) सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला : व्ही.एल.इनामदार
36) वालीवध ना,खलनिर्दालन : सुधीर फडके
37) असा हा एकच श्रीहनुमान् : वसंतराव देशपांडे
38) हीच ती रामांची स्वामिनी : व्ही.एल.इनामदार
39) नको करुंस वल्गना : माणिक वर्मा
40) मज सांग अवस्था दूता,रघुनाथांची : माणिक वर्मा
41) पेटवी लंका हनुमंत : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
42) सेतू बांधा रे सागरी : सुधीर फडके,समूह गान
43) रघुवरा बोलत कां नाही ? : माणिक वर्मा
44) सुग्रीवा हें साहस असले : सुधीर फडके
45) रावणास सांग अंगदा : सुधीर फडके
46) नभा भेदुनी नाद चालले : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
47) लंकेवर काळ कठिण आज पातला : व्ही.एल.इनामदार
48) आज का निष्फळ होती बाण ? : सुधीर फडके
49) भूवरी रावण-वध झाला : समूह गान
50) किति यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते : सुधीर फडके
51) लोकसाक्ष शुध्दी झाली :सुधीर फडके
52) त्रिवार जयजयकार,रामा : समूह गान
53) प्रभो,मज एकच वर द्यावा : राम फाटक
54) डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे : माणिक वर्मा
55) मज सांग लक्ष्मणा,जाउं कुठे ? : लता मंगेशकर
56) गा बाळांनो,श्रीरामायण :सुधीर फडके

सुमित्र माडगूळकर
http://www.gadima.com

Monday, July 9, 2007

थांब सुमंता, थांबवित रे रथ

राम चालले, तो तर सत्पथ
थांब सुमंता, थांबवित रे रथ

थांबा रामा, थांब जानकी
चरणधूळ द्या धरूं मस्तकीं
काय घडें हें आज अकल्पित!

रामराज्य या पुरीं यायचें
स्वप्न लोचनीं अजुन कालचें
अवचित झाले भग्न मनोरथ

गगननील्हे, उष:प्रभा ही
श्रीरघुनंदन, सीतामाई
चवदा वर्षे का अस्तंगत?

चवदा वर्षे छत्र लोपतां
चवदा वर्शे रात्रच आतां
उरेल नगरी का ही मूर्च्छित?

कुठें लपें ती दुष्ट कैकयी?
पहा म्हणावे हीन दशा ही
अनर्थ नच हा, तुझेच चेष्टित

करि भरतातें नृप मातोश्री
रामा मागे निघे जयश्री
आज अयोध्या प्रथम पराजित

पिताहि मूर्च्छित, मूर्च्छित माता
सोदुन रामा, कोठें जातां?
सर्वे न्या तरी नगर निराश्रित

ये अश्रूंचा पट डोळ्यांवर
कोठें रथ तो? केठे रघुवर
गळ्यांत रुतली वाणी कंपित

जेथें राघव तेथें सीता

निरोप कसला माझा घेतां
जेथें राघव तेथें सीता

ज्या मार्गी हे चरण चालती
त्या मार्गी मी त्यांच्या पुढती
वनवासाची मला न भीति
संगे आपण भाग्यविधाता!

संगे असता नाथा, आपण
प्रासादाहुन प्रसन्न कानन
शिळेस म्हणतिल जन सिंहासन
रघुकुलशेखर वरी बैसतां

वनीं श्वापदें, क्रूर निशाचर
भय न तयांसें मजसी तिळभर
पुढती मागें दोन धनुर्धर
चाप त्यां करीं, पाठिस भाता

ज्या चरणांच्या लाभासाठीं
दडलें होतें धरणीपोटी
त्या चरणांचा विरह शेवटीं
काय दिव्य हें मला सांगतां?

कोणासाठीं सदनीं राहूं?
कां विरहाच्या उन्हांत न्हाऊ?
कां भरतावर छत्रे पाहूं?
दास्य करूं कां कारण नसतां?

कां कैकयि वर मिळवा तिसरा?
कां अपुल्याही मनीं मंथरा?
कां छळितां मग वृथा अंतरा?
एकटीस मज कां हो त्यजितां?

विजनवास या आहे दैवीं
ठाउक होते मला शैशवीं
सुखदुःखांकित जन्म मानवी
दुःख सुखावेंप्रीती लाभतां

तोडा आपण; मी न तोडितें
शात जन्मांचे अपुलें नातें
वनवासासी मीही येतें
जाया-पति कां दोन मानितां?

पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचे अखंड पूजन
हें आर्यांचे नारीजीवन
अंतराय कां त्यांत आणिंता?

रामाविण राज्यपदीं कोण बैसतो

रामाविण राज्यपदीं कोण बैसतो?
घेउनियां खड्ग करीं, मीच पाहतो

श्रीरामा, तूं समर्थ
मोहजालि फससि व्यर्थ
पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो

वरहि नव्हे, वचन नव्हे
कैकीयला राज्य हवें
विषयधुंद राजा तर तिजसि मानतो

वांच्छिति जे पुत्रघात
ते कसले मायतात?
तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो?

लंपट तो विषयिं दंग
तुजसि करी वचनभंग
भायेंचा हट्ट मात्र निमुट पाळितो

वर दिधलें कैकेयीस
आठवले या मितीस
आजवरी नृअपति कधीं बोलला न तो?

मत्त मतंगजापरी
दैव तुझे चाल करो
श्रीरामा, मीच त्यास दोर लावितो

बैस तूंच राज्यपदीं
आड केण येइ मधीं
येउं देत, कंठस्नान त्यास घालितो

येऊं देत तिन्ही लोक
घालिन मी त्यांस धाक
पाहुं देच वृद्ध पिता काय योजितो

शत शतकें पाळ धरा
श्रीरामा, चापधरा,
रक्षणासि पाठीं मी सिद्ध राहतों

येइल त्या करिन सजा
बंधू नच, दास तुझा
मातुःश्री कौसल्येशपथ संगतो

नको रे जाउं रामराया

उंबरट्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाउं रामराया

शतनवसांनी येउन पोटीं
सुखविलेंस का दुःखासाठीं?
प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया

कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारी जाया?

तृप्त होउं दे तिचीं लोचनें
भरत भोगुं दे राज्य सुखाने
वनीं धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया?

सांगुं नयें ते आज सांगतें
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणां न कथिल्या मूक यातना या

तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
जळतच जगलें मुला, जीवनीं
तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतिं तरी छाया

अधर्म सांगू कसा बालका?
तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारी न्याया

तुझ्यावांचुनी राहुं कशी मी?
वियोग रामा, साहुं कशी मी?
जमदग्नीसम तात तुझें कां कथिति न माराया

तुझ्या करें दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी
देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया

मोडुं नका वचनास

मोडुं नका वचनास-नाथा मोडुं नका वचनास
भरतालागीं द्या सिंहासन, रामासी वनवास

नलगे सांत्वन, नको कळवळा
शब्द दिले ते आधी पाळा
आजोळाहुन परत बोलवा, झणिं माझ्या भरतास

सुतस्नेहानें हौन वेडे
कां घेतां हे आढेवेढे?
वचनभंग का शोभुन दिसतो, रघुवंशज वीरास?

दंडकवनि त्या लढतां शंबर
इंद्रासाठीं घडलें संगर
रथास तुमच्या कुणी घातला, निजबाहूंचा आंस?

नाथ रणीं त्या विजयी झाले
स्मरतें का ते काय बोलले?
"दिधले वर तुज दोन लाडके, सांग आपुली आस"

नरिसुलभ मी चतुरपणानें
अजुन रक्षिलीं अपुलीं वचनें
आज मागतें वर ते दोन्ही, साधुनिया समयास

एक वरानें द्या मज अंदण
भरतासाठीं हें सिंहासन
दुजा वरानें चवदा वर्षे रामाला वनवास

पक्षपात करि प्रेमच तुमचें
उणें अधिक ना यांत व्हायचें
थोर मुखानें दिलेत वर मग, आतां कां निःश्वास?

प्रासांतुन रामा काढा
वा वंशाची रीती मोडा
धन्यताच वा मिळवा, जागुनि निज शब्दांस

खोटी मूर्च्छा, खोटे आंसूं
ऐश्वर्याचा राम पिपासू
तृप्त करावा त्यास हाच कीं आपणांसि हव्यास

व्योम कोसळो, भेंगो शरणी
पुन्हां पुन्हां कां ही मनधरणी?
वर-लाभाविण मी न घ्यायची, शेवटचाहि श्वास

व्हायचे राम अयोध्यापति

आनंद सांगूं किती सखे ग आनंद सांगूं किती
सीतावल्लभ उद्यां व्हायचे राम अयोध्यापति

सिंहासनिं श्रीराघव बसतां
वामांगी तूं बसशिल सीता
जरा गर्विता, जरा लाज्जता
राजभूषणां भूषवील ही, कमनिय तव आकृति

गुरुजन मुनिजन अमीप येतिल
सप्त नद्यांची जलें शिंपतिल
उभय कुळें मग कृतार्थ होतिल
मेघाहुनिही उच्चरवांनीं, झडतिलं गे नौबति

भर्त्यासम तुज जनीं मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभतां
पुत्राविण तूं होशिल माता
अखील प्रजेच्या मातृपदाची, तुज करणें स्वीकृति
तुझ्याच अंकित होईल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
भाग्य भोगिलें असलें कोणीं?
फळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति

पतीतपावन रामासंगें
पतितपावना तूंही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे
तिन्ही लोकीं भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति

महाराणि तूं, आम्ही दासी
लीन सारख्या तव चरणंसी
कधीं कोणती आज्ञा देसी
तुझिया चरणीं लीन राहुं दे, सदा आमुची मति

विनोद नच हा, हिच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कषा
देवदेवता करोत रक्षा
दृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति

आओळखिचे बघ आले पदरव
सांवलींतही दिसते सौष्ठव
तुला भेटण्या येती राघव
बालिश नयनीं तुझ्या येइ कां, लज्जेला जागृति?