Sunday, May 13, 2007

२७ कोण तूं कुठला राजकुमार ?

२७

"मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका"

-- भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेलें हे दान श्रीराम नाकारूं शकले नाहींत. श्रीरामांच्या चरणधुळीनें पावन झालेल्या त्या सुवर्णमंडित पादुका भरताने हत्तीवरून मिरवीत मिरवीत अयोध्येस नेल्या. त्या पादुकांनाच त्याने राज्याभिषेक करविला आणि स्वत: राज्यकारभार पाहूं लागला.

इकडे श्रीरामांनी चित्रकूट सोडला. प्रवास करीत ते दक्षिणेस निघाले. वाटेंत उभयतां भावांनी विराध नामक राक्षसाचा वध केला. शरभंगाश्रमीं जाऊन त्या स्वर्लोकगामी महात्म्याचें दर्शन घेतलें. शरभंगाश्रमींच कांही ऋषिजनांनी श्रीरामांना नम्र विनंति केली, "आश्रमवासी ऋषिजनांचा राक्षसांकडून अनन्वित छळ होतो आहे. आपण समर्थ आहांत, राजे, आहांत ; धार्मिकांचें रक्षण करा." यावर सर्वज्ञ राम विनयाने आणि निश्चयाने बोलले, " तपस्वीजनांचे चिरशत्रु राक्षस यांचा नायनाट करण्याची माझी इच्छा आहे. आपण निश्चिंत असावें."
ऋषींना अभय-वचन देऊन श्रीराम पुढे संचार करू लागले. सुतीक्ष्णाश्रम पंचाप्सर सरोवर या भागांत त्यांनी दहा वर्षें आनंदाने संचार केला. नंतर सुतीक्ष्णाच्या आज्ञेवरून त्यांनीं अगस्त्याश्रमाचा मार्ग धरला. सुतीक्ष्ण आणि अगस्ति या महर्षीनीं राम-लक्ष्मणांना दिव्यायुधें अर्पण केलीं.

दहा वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटींत आले. त्या मनोहर वनप्रदेशांत त्यांची कुटि अत्यंत शोभून दिसूं लागली.


एकदां याच पर्णशालेच्या ओट्यावर श्रीराम जानकी-लक्ष्मणासह वार्ताविनोद करीत असतांना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणांत आली. अनुरक्तेसारखे अंगविक्षेप करीत, धुंद डोळ्यांनीं ती श्रीरामाला न्याहाळूं लागली. हलकें हलकें मंजुळ स्वर काढून ती श्रीरामाशीं बोलूं लागली. ती म्हणाली ---

शूर्पणखा :

कोण तूं कुठला राजकुमार ?
देह वाहिला तुला शामला, कर माझा स्वीकार ॥धृ.॥

तुझ्या स्वरूपीं राजलक्षणें
रुद्राक्षांचीं श्रवणिं भूषणें
योगी म्हणुं तर तुझ्या भोंवती वावरतो परिवार ॥१॥

काय कारणें वनिं या येसी ?
असा विनोदें काय हांससी ?
ज्ञात नाहिं का ? येथ आमुचा अनिर्बंध अधिकार ॥२॥

शूर्पणखा मी रावणभगिनी
याच वनाची समज स्वामिनी
अगणित रूपें घेउन करितें वनोवनीं संचार ॥३॥

तुझ्यासाठिं मी झालें तरूणी
षोडषवर्षा मधुरभाषिणी
तुला पाहतां मनांत मन्मथ जागुन दे हुंकार ॥४॥

तव अधराची लालस कांती
पिऊं वाटते मज एकांतीं
स्मरतां स्मर का अवतरसीं तूं अनंग तो साकार ? ।।५॥

मला न ठावा राजा दशरथ
मनांत भरला त्याचा परि सुत
प्राणनाथ हो माझा रामा, करु सौख्यें संसार ॥६॥

तुला न शोभे ही अर्धांगी
दूर लोट ती कुरुप कृशांगी
समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणिं करितें संहार ॥७॥

माझ्यासंगे राहुनि अविरत
पाळ तुझें तूं एकपत्निव्रत
अलिंगनाची आस उफाळे तनूमनीं अनिवार ॥८॥

२६ तात गेलें, माय गेली, भरत आतां पोरका

२६
"दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा"

- हें श्रीरामांनी कितीहि वेळा पटवून सांगितलें तरी भरताचे डोळे कोरडे होईनात. तो पुन्हां पुन्हां श्रीरामांना आग्रह करीत होता, "तुम्ही परत चला. राज्याभिषेक करवून घ्या."

भरताप्रमाणेंच, भरताबरोबर आलेल्या ऋषिजनांनी पुष्कळ आग्रह केला. पण श्रीरामांनी नम्रपणें नकारच दिला.

ते म्हणाले, "भरता पित्राज्ञेने मला वनवास आणि तुला सिंहासन मिळाले आहे. तूं परत जा आणि अयोध्येचें राज्य कर. हेंच धर्म्य आणि उचित आहे. पित्राज्ञेप्रमाणें चवदा वर्षे वनवास भोगून मी सीता-लक्ष्मणासह अयोध्य येईन".

श्रीरामांच्या या उत्तराने निराश झालेला भरत गहिंवरला आणि श्रीरामांच्या पादुकांना स्पर्श करून करूणार्द्र स्वरांनीं म्हणाला ----
तात गेलें, माय गेली, भरत आतां पोरका
मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका ॥धृ.॥

वैनतेयाची भरारी काय मशकां साधते ?
कां गजाचा भार कोणीं अश्वपृष्ठीं लादतें ?
राज्य करणें राघवाचें अज्ञ भरता शक्य का? ॥१॥


वंशरीतीं हेच सांगे -- थोर तो सिंहासनीं
सान तो सिंहासनीं कां, जेष्ठ ऐसा काननीं ?
दान देतां राज्य कैसें या पदांच्या सेवका ? ॥२॥

घेतला मी वेष मुनिचा सोडतांना देश तो
कैकयीसा घेउं माथीं का प्रजेचा रोष तो ?
काय आज्ञा आगळी ही तुम्हिच देतां बालका ? ॥३॥

पादुका या स्थापितों मी दशरथांच्या आसनीं
याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनीं
चरणचिन्हें पूजुनीं हीं साधितों मी सार्थका ॥४॥

राम नाहीं, चरणचिन्हें राहुं द्या हीं मंदिरीं
नगरसीमा सोडुनी मी राहतों कोठें तरी
भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळीं दीपिका ॥५॥

चालवीतों राज्य रामा, दुरुन तुम्ही येइतों
मोजितों संवत्सरें मी, वाट तुमची पाहतों
नांदतों राज्यांत, तीर्थी कमलपत्रासारखा ॥६॥

सांगता तेव्हां न आले, चरण जर का मागुती
त्या क्षणीं या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती
ही प्रतिज्ञा, ही कपाळीं पाउलांची मृत्तिका ॥७॥

२५ दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा

२५

"चापबाण घ्या करीं सावधान राघवा ----"

--- असा इशारा श्रीरामचंद्रांना देणारा लक्ष्मण स्वत: भरतावर संतापाने धावून जाऊं लागला तेव्हां श्रीरामांनी परत त्याचें सांत्वन केलें. भरत रामाश्रमांत आला. वेड्यासारखीच त्याने श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली. रामांनी त्याला लवळ घेतला. कुशल प्रश्न विचारले. भांबावून गेलेल्या भरताने मोठ्या कष्टाने पितृनिधनाची वार्ता सांगितली. सर्व आश्रमावरच दु:खाची छाया पसरली. यथाकाळीं श्रीरामांनी वडिलांचे श्राद्ध केलें. भरत पुन्हां पुन्हां म्हणूं लागला, "रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळें आणि वडिलांच्या पत्नीप्रेमामुळें तुम्हाला वनवासी व्हावें लागलें. तेंव्हां सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले ---

दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ॥धृ.॥

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग, काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा ॥१॥

अंत उन्नतीचा पतनीं होइ यां जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा ॥२॥

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसें भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ? ॥३॥

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें कांही, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा ॥४॥

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा ॥५॥

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हां नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा ॥६॥

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा ॥७॥

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळुन दोघे होउं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा ? ॥८॥

संपल्याविना हीं वर्षे दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा ॥९॥

पुन्हा नका येऊं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझा जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा ॥१०॥