आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे
श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
उभे ठाकले भाग्य सांवळे समोर दुहितेचें
मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजीं एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलूं लागलें फूल हळू हळू गालीं लज्जेचें
उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे
अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे
हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथापुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे
Sunday, July 8, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
अप्रतिम
अप्रतिम
Post a Comment