Friday, July 6, 2007

उदास कां तूं?

उदास कां तूं? आवर वेडे, नयनांतिल पाणी लाडले कौसल्ये राणी

वसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी
मनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी
कानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी

ती वाणी मज म्हणे, "दशरथा, अश्वमेघ तूं करी
चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरीं."
विचार माझा मला जागवो, आलें हें ध्यानीं

निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली-
"वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थलीं.
इष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी"

आले गुरुजन, मनांतलें मी सारें त्यां कथिलें
मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें
नवनीतासम तोंच बोलले स्निग्धमधुर कोणी

"तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे", मनोदेवतो वदे,
"याच मुहूर्ती सोड अश्व तूं, सत्वर तो जाउं दे"
"मान्य"-म्हणालो-"गुर्वाज्ञा" मी, कर जुळले दोन्ही

अंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतो स्वतः
त्याच्या करवीं करणें आहे इष्टीसह सांगता
धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनी

सर्यूतीरीं यज्ञ करूं गे, मुक्त करांनी दान करूं
शेवटचा हा यत्न करूं गे, अंती अवभृत स्नाना करूं
ईप्सित तें तो देइल अग्नी, अनंत हातांनीं

No comments: