Sunday, May 13, 2007

२७ कोण तूं कुठला राजकुमार ?

२७

"मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका"

-- भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेलें हे दान श्रीराम नाकारूं शकले नाहींत. श्रीरामांच्या चरणधुळीनें पावन झालेल्या त्या सुवर्णमंडित पादुका भरताने हत्तीवरून मिरवीत मिरवीत अयोध्येस नेल्या. त्या पादुकांनाच त्याने राज्याभिषेक करविला आणि स्वत: राज्यकारभार पाहूं लागला.

इकडे श्रीरामांनी चित्रकूट सोडला. प्रवास करीत ते दक्षिणेस निघाले. वाटेंत उभयतां भावांनी विराध नामक राक्षसाचा वध केला. शरभंगाश्रमीं जाऊन त्या स्वर्लोकगामी महात्म्याचें दर्शन घेतलें. शरभंगाश्रमींच कांही ऋषिजनांनी श्रीरामांना नम्र विनंति केली, "आश्रमवासी ऋषिजनांचा राक्षसांकडून अनन्वित छळ होतो आहे. आपण समर्थ आहांत, राजे, आहांत ; धार्मिकांचें रक्षण करा." यावर सर्वज्ञ राम विनयाने आणि निश्चयाने बोलले, " तपस्वीजनांचे चिरशत्रु राक्षस यांचा नायनाट करण्याची माझी इच्छा आहे. आपण निश्चिंत असावें."
ऋषींना अभय-वचन देऊन श्रीराम पुढे संचार करू लागले. सुतीक्ष्णाश्रम पंचाप्सर सरोवर या भागांत त्यांनी दहा वर्षें आनंदाने संचार केला. नंतर सुतीक्ष्णाच्या आज्ञेवरून त्यांनीं अगस्त्याश्रमाचा मार्ग धरला. सुतीक्ष्ण आणि अगस्ति या महर्षीनीं राम-लक्ष्मणांना दिव्यायुधें अर्पण केलीं.

दहा वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटींत आले. त्या मनोहर वनप्रदेशांत त्यांची कुटि अत्यंत शोभून दिसूं लागली.


एकदां याच पर्णशालेच्या ओट्यावर श्रीराम जानकी-लक्ष्मणासह वार्ताविनोद करीत असतांना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणांत आली. अनुरक्तेसारखे अंगविक्षेप करीत, धुंद डोळ्यांनीं ती श्रीरामाला न्याहाळूं लागली. हलकें हलकें मंजुळ स्वर काढून ती श्रीरामाशीं बोलूं लागली. ती म्हणाली ---

शूर्पणखा :

कोण तूं कुठला राजकुमार ?
देह वाहिला तुला शामला, कर माझा स्वीकार ॥धृ.॥

तुझ्या स्वरूपीं राजलक्षणें
रुद्राक्षांचीं श्रवणिं भूषणें
योगी म्हणुं तर तुझ्या भोंवती वावरतो परिवार ॥१॥

काय कारणें वनिं या येसी ?
असा विनोदें काय हांससी ?
ज्ञात नाहिं का ? येथ आमुचा अनिर्बंध अधिकार ॥२॥

शूर्पणखा मी रावणभगिनी
याच वनाची समज स्वामिनी
अगणित रूपें घेउन करितें वनोवनीं संचार ॥३॥

तुझ्यासाठिं मी झालें तरूणी
षोडषवर्षा मधुरभाषिणी
तुला पाहतां मनांत मन्मथ जागुन दे हुंकार ॥४॥

तव अधराची लालस कांती
पिऊं वाटते मज एकांतीं
स्मरतां स्मर का अवतरसीं तूं अनंग तो साकार ? ।।५॥

मला न ठावा राजा दशरथ
मनांत भरला त्याचा परि सुत
प्राणनाथ हो माझा रामा, करु सौख्यें संसार ॥६॥

तुला न शोभे ही अर्धांगी
दूर लोट ती कुरुप कृशांगी
समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणिं करितें संहार ॥७॥

माझ्यासंगे राहुनि अविरत
पाळ तुझें तूं एकपत्निव्रत
अलिंगनाची आस उफाळे तनूमनीं अनिवार ॥८॥

No comments: